चंद्रपूर-घुग्घुस-वणी महामार्ग क्र. ७ हा मार्ग घुग्घुस शहरातून गेलेला आहे. या मार्गाने रात्रंदिवस सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. वेकोलीची वाहनेदेखील याच मार्गाने ये-जा करतात. हा दुहेरी मार्ग आहे. रस्त्याच्या दोन्हीकडेला ग्रामपचायती असताना पथदिव्यांचे खांब उभे केलेले आहेत. मात्र दोन खांबांमध्ये खूप अंतर असल्यामुळे दोन खांबांच्या मधोमध अंधार पडतो. रात्री या परिसरात जनावरे बसलेली असतात. ती वाहनधारकांना दिसत नाही. याच मार्गावर वेकोलीचे केंद्रीय राजीव रतन रुग्णालय आहे. या मार्गाचा वापर वेकोलीच्या नायगाव, निलजई, उकणी, मुंगोली, पैनगंगा, कोलगाव कोळसा खाण, एसीसी, लायड कंपनीचे कामगार करतात. या मार्गाने जाणाऱ्या भरधाव वाहनाचे हेडलाईमुळे डोळे दिपून जातात आणि रस्ता दिसत नाही. यामुळे अपघात घडत आहे.
दुभाजकामध्ये प्रियदर्शनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय ते वर्धा नदी टोल एसएसटी पाईंटपर्यत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पथदिवे लावून रस्त्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्ष सुशीला डकरे यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे, सुरेश बोबडे, संजय भालेराव, बुद्धराज कांबळे, एस. जी. भालेराव यांचा समावेश होता.