कव्हरेजअभावी मोबाईल सेवा ठप्प
जिवती : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहे. काही महिन्यांपासून कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झाली आहे.
वडगाव परिसरातील पथदिवे बंद
चंद्रपूर : वडगाव परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सुमारास या मार्गावर अंधार पसरलेला असतो. त्यामुळे किरकोळ अपघात घडत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
चंद्रपूर : कोरपना, जिवती मार्गावरील अनेक बसथांब्यावर असलेल्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी निवाऱ्यांचे छत तुटली आहेत, तर अनेकांच्या भिंती पडल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
स्वच्छता करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश वार्डातील नाल्यांची स्वच्छता नियमित केली जात नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाल्याची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
काम देण्याची बेरोजगारांची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील स्थानिक युवकांना पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने उद्योग असतानाही बेरोजगार इतरत्र भटकत आहे. त्यामुळे अन्याय दूर करून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंद केलेल्या सर्वांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लाऊन वाहनचालक सर्रासपणे वाहन रस्त्यावरून चालवितात; मात्र या वाहनांवर कारवाई करण्यास संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी स्टंट करणाऱ्या एका वाहनचालकांना सामान्य नागरिकाला धडक दिल्याने अपघात झाला होता.
सोयी उपलब्ध करून द्याव्या
चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर, तसेच जिल्ह्यातील इतर मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री, तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा पुरवाव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना जिल्हा सामान्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तसेच खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागत आहे. यात आर्थिक ताण पडत आहे. आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.