गोवरी : राजुरा तालुक्यातील कढोली (बु) येथे मोठ्या प्रमाणात तापाची साथ आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने कढोली (बु) येथे नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकाच दिवशी ९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असल्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. मागील दोन आठवड्यांपासून कढोली (बु) येथे तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने शुक्रवारी कढोली (बु.) येथे तपासणी शिबिर घेतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कढोली (बु) येथे सकाळी १० वाजल्यापासून तपासणी सुरू करण्यात आली. यात कढोली (बु) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीनकुमार ओदेला, आरोग्य विभागाचा चमू, आरोग्य कर्मचारी, सर्व आरोग्यसेविका, सरपंच राकेश हिंगाणे, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे आरोग्य चाचणी शिबिर घेण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विपीनकुमार ओदेला व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कढोली (बु) येथील साईनाथ विद्यालयाला विलगीकरण लक्ष म्हणून घोषित केले असून, यामध्ये २० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयातर्फे ग्रामस्थांना तपासणी करण्याविषयी सांगण्यात आले आहे.