हंसराज अहीर यांची उपस्थिती : चंद्रपुरात कार्यक्रमचंद्रपूर : विक्रीकर विभागातर्फे १ आॅक्टोंबर हा दिवस दरवर्षी विक्रीकरदिन म्हणून साजरा केला जाते. यानिमित्त विक्रीकर कार्यालय चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्यातील मोठ्या करदात्यांचा चंद्रपुरात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नाना श्यामकुळे होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते करदात्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील मोठे करदात्यांमधून पाच उद्योजकांची पुरस्कारासाठी निवड झाली असून अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या उद्योगाला राज्यस्तरावर मुंबईसाठी तर अंबुजा सिमेंट लिमिटेड या उद्योगाला प्रादेशिक स्तरावर नागपूर येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर विभागात एकूण विक्रीकर महसूलाच्या २० टक्के वाटा हा चंद्रपूर जिल्ह्याचा असून नागपूर विभागात नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो, अशी माहिती विक्रीकर उपायुक्त सुनील लहाने यांनी याप्रसंगी दिली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्या हस्ते बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड बल्लारपूर, गोपानी आयर्न अॅन्ड पॉवर लिमिटेड चंद्रपूर, पार्श्व मोटार्स लिमिटेड चंद्रपूर या तीन उद्योजकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून विक्रीकर निरीक्षक विकास जक्कुलवार यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन विक्रीकर निरीक्षक पिंपळशेंडे यांनी तर आभार उपायुक्त प्रफुल्ली मेंडूलकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
विक्रीकर दिनानिमित्त करदात्यांचा सत्कार
By admin | Published: October 04, 2016 12:48 AM