मद्यधुंद ट्रकचालकाला बदडले
घुग्घुस : घुग्घुस- चंद्रपूर रस्त्यावरील पडोली एम.आय.डी.सी. समोर रस्त्याच्या बाजूला एमआयडीसीमध्ये पाणी पुरवठा करणार्या पाईप लाईनची दुरुस्ती करीत असलेल्या दोन कामगारांना घुग्घुसकडे भरधाव जाणार्या ट्रकने चिरडले. यात या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व मद्यधुंद ट्रकचालकाला चांगलेच बदडून काढले. पडोली पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे अनुचित प्रकार टळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता चंद्रपूरला पाठविले. ही घटना घुग्घुस चंद्रपूर मार्गावर एमआयडीसी पडोलीकडे वळणार्या रस्त्यावर आज गुरुवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. रर्वीद्र पांडुरंग खोकले, आतिश विठ्ठल भगत रा. धानोरा अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर उभा होता. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून तात्काळ क्रेनच्या सहाय्याने ट्रक हलविण्यात आला. मृताच्या कुटुंबियांना ठेकेदाराने प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याचे मान्य केले. घुग्घुस- चंद्रपूर मार्गाच्या बाजुला एमआयडीसीच्या पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. आज नेहमीप्रमाणे रर्वीद्र पांडुरंग खोकले, आतिश विठ्ठल भगत हे कामगार काम करीत होते. दरम्यान, भरधाव जाणार्या ट्रकने ( क्र.एपी ३६ व्ही.८४४९) दोघांनाही धडक दिली. यात रवींद्र व आतिश ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची बातमी वार्यासारखी पसरली आणि लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ट्रकचालक मुरारी महादेव मंडल (३४) रा. गुवाहाटी मद्यधुंद असल्याचे निदर्शनात येताच त्याला नागरिकांकडून तिथेच बदडून काढले. मात्र वेळीच पोलीस पोहचल्याने अनर्थ टळला. अपघातात जागीच मृत्यू झालेल्या मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या अशी मागणी करीत शवविच्छेदन करण्यास लोकांनी मज्जाव केला. त्यामुळे रुग्णालयातही तणावाची स्थिती होती. खा. हंसराज अहीर, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, धानोर्याचे माजी सरपंच विजय आगरे, श्रावण जुनघरी यांनी वाटाघाटी करून ठेकेदाराकडून एक - एक लाख रुपयाची मदतीचा धनादेश मिळवून दिला. (वार्ताहर)