चंद्रपूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. त्यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सध्या येथे २० ते २२ कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. हे कर्मचारी सतत मृतदेहाजवळ असतात. अशावेळी आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरीब घरातील अशा कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनामार्फत पन्नास लाखांचे विमा सुरक्षा कवच काढल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आधार राहील, अशी मागणी सेवादल काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिरीष तपासे यांनी महापौर व आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोना रुग्णांसह मृतांची संख्या वाढली आहे. त्याचा ताण २० ते २२ कर्मचाऱ्यांवर येत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
गंजवाॅर्डात दुर्गंधीने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : येथील भाजीबाजार असलेल्या गंजवाॅर्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.
दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर गर्दी नसल्याने गतिरोधक निर्माण केल्यास अडचण दूर होणार आहे.
शहरात स्वच्छता मोहीम राबवावी
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्रकारही बंद करण्यासाठी मनपाने निर्देश द्यावे. या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नि:शुल्क वाहनतळ निर्माण करावे
चंद्रपूर : विविध भागात वाहनतळ नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने शहरात वाहनतळ निर्माण करण्याची मागणी आहे.
प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना नोकरी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अनियंत्रित वाहनांवर कारवाई करा
चंद्रपूर : पठाणपुरा, नागपूर रोड, बल्लारपूर रोड, तुकूम, दुर्गापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषत: नियमानुसार वाहन न चालविता वाट्टेल तसे वाहन पळविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. एवढेच नाही तर रस्त्याच्या वळणावर वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा वाहनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आयुक्तालय कार्यालय निर्माण करा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महापालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या व नगर विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य शहराच्या धर्तीवर चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.