एसीबीची कारवाई : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती चंद्रपूर : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात हिवताप कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या शंकर मोडकू मेश्राम याच्याविरूद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून उत्पन्नापेक्षा अधिक सहा लाख ६१ हजार ७० रूपयांची अपसंपदा असल्याचे तपासानंतर आढळले आहे. शंकर मोडकू मेश्राम याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपती असल्याच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्यावरून लाचलुचपत विभागाचे नापूर प्रभारी पोलीस अधीक्षक राकेश फर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी छापा घालून चौकशी केली असता हा प्रकार आढळला.शंकर मेश्राम जुलै १९९४ पासून जानेवारी २०१२ पर्यंत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात कार्यरत होता. आपल्या सेवाकाळात पदाचा दुरूपयोग करून ही संपत्ती मिळविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपासानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार यांनी त्याच्याविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कलम १३ (१) (ई) तसेच १३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदिण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक डी.एम. घुगे करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
हिवताप कर्मचाऱ्याविरूद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल
By admin | Published: June 15, 2016 1:08 AM