चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथे एका इसमाची हत्या करणाऱ्या वाघाला पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या वाघाला पकडण्यासाठी चिमूर येथे शार्पशूटर दाखल झालेले आहेत
ब्रह्मपुरी वन विभाग चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे या व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे तेथील गावकरी संतप्त झाले होते. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी उचलू देणार नाही, असा पवित्र घेतला होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच वन विभागाने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून दिले. त्यात बारा मागण्या नमूद केलेल्या आहेत. त्या बारापैकी वाघाचा बंदोबस्त करावा, ही मुख्य मागणी होती. त्या मागणीला अनुसरून ब्रह्मपुरी वन विभागामार्फत त्या वाघाला पकडण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी मिळाली असून त्या वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूर येथील वनविभागाची चमू दाखल झाली आहे. शुक्रवार दि. १७ मे रोजी पासून पहाटे चार वाजता पासून या टीमने त्या वाघाला पकडण्यासाठी जंगलात मोहीम राबवणे सुरू केले आहे. वृत्त लिहेपर्यंत तो वाघ वन विभागाच्या नजरेत आलेला नाही. सध्या वाघ ताडोबाच्या बफर झोन मध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. ताडोबा बफरचे वन कर्मचारी त्या वाघाच्या मागावर आहेत. सध्या गावकऱ्यांच्या मागणीनुसार निमढेला पर्यटनस्थळ दि. 16 पासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे, तर जंगलाभोवती सोलर फिनिशिंगचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवणार असल्याची माहिती वन विभागाकडून मिळालेली आहे. सध्या तरी हा वाघ छोटा मटकसूरचा बछडा असल्याचे चर्चा आहे.
घराच्या आडोश्याला वाघशुक्रवारी पहाटे वाहनगाव येथील चिमूर-वरोरा या राज्य महामार्गावर वाघ दिसून आला आहे. हा वाघ वाहनगाव येथील नानकसिंग अंधेरेले यांच्या घराच्या आडोशाला लपून बसल्याचे दिसून आलेले आहे. परंतु तो तिथूनही निघून जंगलामध्ये गेला. वन विभागाने माहिती दिलेल्यानुसार, वाहनगाव येथे आलेला वाघ आणि खानगाव येथे बळी घेणारा वाघ वेगळा आहे. मात्र हे दोन्ही वाघ दिसत असल्याने त्या वाघाची दहशत मात्र अजूनही कायम आहे.