एका गोऱ्ह्याला केले ठार : वाघीणही उपाशीच, भीती कायम
पळसगाव (पिपर्डा) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव परिसरात एका वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. या वाघिणीने दोघांना जखमी केले आहे. वाघिणीसोबत असलेले दोन्ही बछडे तिच्यापासून विभक्त झाले आहे. तेव्हापासून वाघीण त्याच परिसरात आहे. अशातच तिच्यापासून दूर गेलेल्या बछड्याने बुधवारी रात्री गावात प्रवेश केला. नागरिक ओरडल्यानंतर त्याने धूम ठोकली आणि गावाबाहेर एका गोऱ्ह्यावर हल्ला चढवून ठार केले.
बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वाघिणीचा बछडा गावात शिरला. वीज खंडित झाली असल्यामुळे बछडा कुणाला दिसला नाही. ताराचंद गुळधे यांच्या घरी बछडा शिरणार तेवढ्यात वीज आली आणि वाघाचा बछडा अंगणात दिसून आला. त्याच वेळी ताराचंदने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे बछडा शेताकडे गेला. तिथे नंदू मोहूर्ले यांच्या गोऱ्ह्यावर त्याने हल्ला करीत ठार केले. वाघीण आणि तिच्या बछड्यामुळे गावात प्रचंड दहशत पसरली आहे.
बॉक्स
सौर तारांमुळे बछडा जंगलात जाईना
वनविभागाच्या वतीने गावाभोवताल सौर तारांचे कुंपन केले आहे. यामुळे वाघिणीच्या बछड्याला जंगलात जाता येत नाही आहे. म्हणून बछडा गावात येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.