राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : तब्बल तीन दिवस वाघाने सचिन तेंडुलकर व त्यांच्या परिवाराला हुलकावणी दिली. मात्र अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ताडोबातील सिरकाळा बफर झोनमध्ये छोटी राणी वाघीण, तिच्या दोन बछड्यांसह पाटलीणबाई वाघीणच्या दोन दोन वयस्क बछड्याने दर्शन दिले. अखेर दौरा सार्थक झाल्याचे भाव ताडोबाचा निरोप घेताना सचिन व त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर झळकत होते. यासोबतच आठ रानकुत्री आणि बिबटाचे दर्शन सचिन व परिवाराला झाले. सचिन व पत्नी डाॅ. अंजली यांच्यासह मित्र परिवाराने दुपारी साडेचार वाजता मी पुन्हा येईल म्हणत ताडोबाचा निरोप घेतला.
सचिनने घेतली सामान्य पर्यटकांसारखी ट्रीटमेंट
पावसाळ्यात कोअर झोनमध्ये सफारी बंद असते. त्यामुळे पर्यटकांना बफरमध्येच प्रवेश असतो. सचिन भारतरत्न असल्याने त्याला कोअरमध्येही जाता आले असते. मात्र सर्वसामान्य पर्यटकांना जे नियम तेच मला, असे म्हणत बफरमध्येच सफारी केली.
माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य व्याघ्र दर्शनापासून वंचित
माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य हे सुद्धा सचिनसोबत सफारीला आले होते. त्यांनीही तीन दिवस सफारी केली. मात्र त्यांना तीनही दिवस वाघाचे दर्शन झाले नाही. प्रशांत वैद्य यांनी कामानिमित्त सोमवारी रिसोर्ट सोडले.
फॅनला दिला बॅटवर ऑटोग्राफ
क्रिकेटचे काही चाहते नागपूरवरून सचिनच्या भेटीला बांबू रिसोर्टवर आले होते. जाताजाता सचिनची त्यांना भेट घडली. एका मुलीने सोबत बॅट आणली होती. त्या बॅटवर सचिनने ऑटोग्राफ दिल्याने ती मुलगी जामखुश झाली.
इंग्लंडमधील भारताच्या विजयाबद्दल सचिन आनंदी
बांबू रिसोर्टवरून निरोप घेताना प्रस्तुत प्रतिनिधीने सचिनला बोलते केले असता इंग्लंडमधील ओवल मैदानावर भारतीय संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने पन्नास वर्षांनंतर कसोटीमध्ये विजय प्राप्त केला. या विजयामुळे मी आनंदित असून, भारतीय संघाने असेच खेळत राहून विजय संपादन करत राहावे, अशी भावना व्यक्त केली.
ताडोबाचे कौतुक
ताडोबाचा परिसर निसर्गरम्य प्रफुल्लित व आनंदी आहे. येथील नागरिक खूप छान आहेत. तीन दिवस सफारी केली. त्यामध्ये वाघाचे दर्शन झाले नाही, मात्र चौथ्या दिवशीही इच्छा पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.