घुग्घुस: उत्खनन अधिकारी असल्याची बतावणी करून वर्धा नदी वढा घाट गाठून रेती ट्रॅक्टर मालकाकडून हजारो रुपये वसूल करून एका महिलेने पळ काढला. ही बाब लक्षात येताच घुग्घुस पोलीस ठाण्यात तत्कालीन अधिकारी अलका खेडेकर यांनी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार प्रिया परमेश्वर झामरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र जामीन अर्ज फेटाळल्याने येथील सहायक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांनी एक वर्षानंतर तिला अटक करून न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने या तोतया महिला अधिकाऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
घटना वढा येथे १९ जून २०२० घडली होती. एका स्कार्पिओ वाहनाने प्रिया परमेश्वर झामरे (४०) व तिच्यासोबत असलेले दोन इसम उत्खनन अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रॅक्टर मालकाकडून मोठी रक्कम घेऊन फरार झाले. या घटनेचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक चहांदे यांच्याकडे होता. त्यानंतर त्यांची बदली झाली व तपास मेघा गोखरे यांच्याकडे ठाणेदाराने सोपविला होता.