११.७० कोटींचा निधी : मत्स व्यावसायिकांना दिलासापेंढरी (कोके) : सन २०१३ च्या जून ते सप्टेंबर महिन्यात विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मच्छीमारी संस्थांच्या तलावातील मासे, मत्सबीज, होळ्या, जुना मत्ससाठा, जाळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य शासनाने मत्स्य व्यवसायिकांना नुकताच ११.७० कोटी रुपयांचा परत गेलेला निधी मंजूर केला आहे. यामुळे मत्स व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.याबाबत तत्कालिन पशु व मत्स्य व्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांच्या दालनात ३ सप्टेंबर २०१३ ला आ.विजय वडेट्टीवार, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात मत्स्य व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या सभेत केंद्र शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार केंद्र शासन आपत्ती व्यवस्थापन पत्र क्र. ३२-३/२०१३ एन.डी.एम.-१ दिनांक ७ नोव्हेंबर २०१३ अन्वये मत्स्य व्यवसायिकांना ११.७० कोटी रुपये केंद्र शासनाकडून प्राप्त झाले.त्यावेळी १३ फेब्रुवारी २०१४ च्या महाराष्ट्र शासन निर्णयान्वये संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सदर निधी वितरित करण्याकरिता पाठविण्यात आला. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ३१ मार्च २०१४ पर्यंत निधी वाटप न झाल्यामुळे सदर निधीची रक्कम राज्य शासनाकडे परत गेली. त्यानंतर मत्स्य व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने पुनश्च आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात तत्कालिन मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या दालनात संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत ५ जून २०१४ ला पुनश्च बैठक घेऊन परत गेलेल्या निधीची मागणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. त्यामध्ये पूर्वीच्या तांत्रिक अडचणी दूर करून सदर निधी मत्स्य संस्थांना देण्याचे ठरविण्यात आले. यासंबंधी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून त्यांनी आपल्या विशेष फंडातून निधी देण्याचे कबूल करवून तसे पत्र घेतले. परंतु शासन बदलल्यामुळे बराच कालावधी लोटूनही सदर निधीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे १ फेब्रुवारी २०१५ ला राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदन दिले आणि २५ फेब्रुवारी २०१५ ला मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन निधी मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार मत्स्य व्यवसायिकांचे प्रयत्न व आ. वडेट्टीवार यांच्या सततच्या लेखी पाठपुराव्यामुळे तथा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुनर्वसन खात्याला निर्देश दिल्यामुळे महसूल तथा वनविभाग शासन निर्णय क्र.एस.सी.वाय. ०१/२०१४/प्र.क्र. ०३/मं/११ दिनांक २७ मार्च २०१५ अन्वये रुपये ११.७० कोटी मत्स्य व्यवसायिकांच्या संस्थांना वितरित करण्याकरिता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मत्स्य व्यवसाय विभागाला निधीची रक्कम पाठविण्यात आली. सदर निधी हा संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे आला आहे. दरम्यान, हा निधी परत येईल, अशी आशा मत्स्य व्यावसायिकांना नव्हती. निधी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)२०१३ च्या अतिवृष्टीत मत्स्य व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईचा निधी आता मिळाला असतानाही मत्स्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्या निधीचे मत्स्य व्यवसायिकांना अजूनपर्यंत वाटप झाले नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
अखेर ‘तो’ निधी मिळाला परत
By admin | Published: April 12, 2015 12:45 AM