बियाणे उगविलेच नाही : ४५२ शेतकऱ्यांचे झाले होते नुकसानप्रवीण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे जेएस ९५६० या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. यासोबतच सदर बियाणे कृषी केंद्रातून घेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु वरोरा तालुक्यातील ३३० हेक्टरमधील ४५२ शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणाची उगवणच झाली नाही. महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, याकरिता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधले. याची दखल घेत आता महाबीज कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू केले आहे.वरोरा तालुक्यातील भेंडाळा, अंतापूर, पिंपळगाव, वडधा, दिंदोडा, जामगाव, धानोली, चारगाव (खु), साखरा, बोरगाव, परसोडा आदी गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीने जेएच ९५६० या वानाचे सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी अनुदानावर कृषी केंद्रातून सदर वानाचे सोयाबीन बियाणे घेवून पेरणी केली. मात्र कित्येक दिवस लोटूनही सोयाबीन बियाणाची उगवण झाली नाही. त्यामुळे ३३० हेक्टर जमिनीतील ४४२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर कृषी विभागात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. सोयाबीन पेरणीचा हंगाम निघून गेला व पेरलेल्या सोयाबीनवर झालेला खर्च व एक हंगाम जमीन पिकाविना पडून राहणार, यामुळे शेतकरी पूर्णत: खचला होता. दरम्यान, लोकमतने शेतकऱ्यांची ही व्यथा प्रकाशित करून सातत्याने याचा पाठपुरावा केला. कृषी विभागाने तपासणी चमू तयार करून तक्रारग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून अहवाल शासनाकडे व महाबीज कंपनीकडे जुलै २९१६ मध्ये सादर केला. परंतु या अहवालात त्रुटी असल्याचे वारंवार महाबीज कंपनीने कृषी विभागास कळविले.तेवढ्याही त्रुटी दूर करण्याकरिता कृषी विभागाने कंबर कसली. त्यानंतर महाबीजकडून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. महाबीज कंपनीने नुकसान भरपाई देण्याकरिता शेतकऱ्यांचे बँक खाते मागून त्या बँक खात्यात नुकसान भरपाई देणे सुरू केले आहे. मागील हंगामातील नुकसान भरपाई चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आपण त्याच वेळेस केली होती. महाबीज कंपनीने तातडीने नुकसान भरपाई दिली असती किंवा बियाणे पुरविले असते तर शेतकऱ्यांचा एक हंगाम व्यर्थ गेला नसता हे विशेष!- विशाल बदखल, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यासंबंधी अचूक माहिती दिली. त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होत आहे. ज्यांनी बँक खाते व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली नाही, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विलंब होत आहे. परंतु येत्या काही दिवसात सुरळीत होईल.- व्ही.आर. प्रकाशतालुका कृषी अधिकारी वरोरा
अखेर महाबीजने दिली नुकसानभरपाई
By admin | Published: May 08, 2017 12:35 AM