नागभीड-बाम्हणी-चांदी हा आंतर जिल्हा मार्ग सुरू राहणार आहे. हा मार्ग बंद करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाने चालविल्या होत्या. मात्र ‘लोकमत’ने यासंदर्भात लक्ष वेधल्यानंतर रेल्वे विभागाने भूमिगत रस्त्याचे काम सुरू केले आहे.
नागभीड नगरपरिषदेत समावेश असलेल्या बाम्हणी येथून हा आंतर जिल्हा मार्ग भंडारा जिल्ह्यातील पवनीकडे जातो. पवनीला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून नागभीड तालुक्यातील अनेक नागरिक या रस्त्यानेच प्रवास करतात. तर पवनी तालुक्यातील चांदी, चन्नेवाडा व इतर दोन-तीन गावांना पवनीपेक्षा नागभीड जवळ असल्याने या गावातील नागरिक कोणत्याही कामासाठी याच रस्त्याने नागभीडला येतात. एवढेच नाही तर या गावातील बरेचसे विद्यार्थी नागभीड येथेच शिक्षणासाठी येत असतात. बाम्हणी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रेल्वे लाईनच्या पलीकडे आहेत. त्यामुळे बाम्हणी येथील नागरिकांना रोजच रेल्वे फाटक ओलांडून शेतात जावे लागते.
आतापर्यंत नाॅरो गेज रेल्वे लाईन असल्यामुळे कोणतीच अडचण नव्हती. रेल्वेने तयार केलेल्या फाटकावरून नागरिक व वाहनाचे अवागमन सुरू होते. पण आता या रेल्वे लाईनचे ब्राडगेजमध्ये रूपांतर होत असल्याने रेल्वे विभाग आता पूर्वीप्रमाणे याठिकाणी फाटक ठेवण्यास तयार नव्हता. फाटकच राहणार नसल्याने अवागमन बंद होणार हे निश्चित होते. तसे सूतोवाच रेल्वेने करून कोटगाव येथून पर्यायी रस्ता देण्याचे नियोजन केले होते. रेल्वेचे हे नियोजन बाह्मणीवासीयांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी येथील तहसीलदारांना हा आंतर जिल्हा मार्ग सुरू ठेवण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते.
बॉक्स
मार्ग बंद झाल्यास अनेक समस्या
रेल्वेने हा मार्ग बंद केला तर बाम्हणी येथील शेतकऱ्यांसमोर तसेच भंडारा जिल्ह्यातील काही गावांसमोर अनेक समस्या निर्माण होणार होत्या. दरम्यान ‘लोकमत’नेही यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर रेल्वे विभागाने नमते घेत भूमिगत रस्ता देण्याचे मान्य करून तसे काम सुरू केले आहे.
कोट
हा मार्ग बंद झाला असता तर दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले असते. पण आता रेल्वेने भूमिगत मार्गाच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
- अमृत शेंडे, माजी सरपंच, बाम्हणी
230921\1728-img-20210923-wa0035.jpg
रेल्वेने सुरू केलेले भूमिगत मार्गाचे काम