जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले.
टेकामांडवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्या बांधल्या जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटिका सिंधू जाधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जीवन तोगरे यांनी १५ दिवसांच्या आत टेकामांडवा येथील आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी २८ जून २०२१ रोजी अवघ्या २४ तासातच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच रंगरंगोटी करून रुग्णालयाला नवी झळाळी देण्यात येणार आहे. शिवसेना महिला संघटिका सिंधू जाधव यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयापुढे अखेर आरोग्य विभागाला नमावे लागले.
बॉक्स
इमारत बांधल्यापासून होती ओसाड
परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी या हेतूने पाच ते सहा वर्षांपासून लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली; मात्र कोणताही वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला नाही. त्यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी या इमारतीचा उपयोग शेळ्या-मेंढ्या बांधण्याकरिता करीत होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जीवन तोगरे व शिवसेना तालुका संघटिका सिंधू जाधव यांनी रुग्णालय सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व रुग्णालयाची पाहणी केली. लवकरच रंगरंगोटी करून रुग्णालय रुग्णाच्या सेवेत उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी सांगितले. डॉ.श्रद्धा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
050721\img-20210705-wa0075.jpg
फोटो-जीवन तोगरे आणि सिंधूताई जाधव