चंद्रपूर : जिल्हा परिषदेने केंद्र प्रमुखांच्या बदल्यांना अखेर स्थगीती दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघाच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या निर्णयात बदल केला आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने समुपदेशनाने केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अधिव्याख्याता, सहाय्यक शिक्षकांच्या बदल्या करण्याचे ठरविले होते. त्यासाठी २३ मे ही तारीखही ठरविण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेवर प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघाने आक्षेप घेतला होता. २0 मे रोजी या संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांची भेट घेतली. केंद्र प्रमुख हे शिक्षक संवर्गात येतात. त्यामुळे आरटीई अँक्ट-२00९ च्या व्याख्या संदर्भानुसार केंद्रप्रमुख हे समायोजन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलीस पात्र ठरत नसल्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही बाब लक्षात आल्याने अखेर २0 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या प्रक्रियेतून केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक (वर्ग ३), अनिष्ठ अधिव्याख्याता, निम्न आणि उच्च श्रेणीतील सहाय्यक शिक्षकांच्या बदल्यांना स्थगीती दिली. मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेणार्या शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष रामराव हरडे, मारोतराव रायपुरे, शिवराम वांढरे, नाना गिरडकर, सुध चंदनखेडे, चिंधेश्वर गेडाम, विजय भोयर, चंद्रमणी देठे यांचा समावेश होता. दरम्यान, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आणि उच्च विस्तार अधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया कायम राहणार आहे. त्यासाठी २३ मे रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रक्रिया चालणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्रप्रमुखांच्या बदल्यांना अखेर स्थगिती
By admin | Published: May 22, 2014 12:57 AM