दुर्गापूर (चंद्रपूर) : मागील काही दिवसांपासून दुर्गापूर परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला गुरूवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी वन विभागाने जेरबंद केले. वन विभागाच्या या कारवाईने दुर्गापूरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दुर्गापूर येथील वेकोलिमुळे मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे वन विभागाने नेट लावून सुरक्षा दिली होती. अशातच ९ फेब्रुवारी रोजी एका घराच्या छतावर चढून बिबट्याने श्वानाची शिकार केली होती. तेव्हापासून बिबट्याने त्या परिसरात येऊन अनेक कोंबड्यांना आपले भक्ष्य बनवले होते. त्यामुळे गावात दहशत पसरली होती.
वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे, १५ ट्रॅप कॅमेरे बसवले होते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास समुदाय भवनजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक रामगावकर, विभागीय अधिकारी खाडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगावकर, दुर्गापूरचे क्षेत्र सहायक तिजारे, वनरक्षक दहेगावकर, शूटर वनकर, चावरे, चहांदे, शुभम गेडाम, पीआरटी चमूने केली.बॉक्स
पाच महिन्यांत चार बिबटे, दोन वाघ जेरबंदचंद्रपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगावकर यांना वाघ, बिबट्या पकडण्याचा दीर्घ अनुभव आहे. ते रुजू झाल्यापासून पाच महिन्यांत चंद्रपूर परिसरात दोन वाघ, चार बिबटे, एक अस्वल पकडून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. वन्यप्राणी येऊ नयेत म्हणून आपला परिसर साफ ठेवावा, घराजवळील, मोकळ्या जागेवरील झुडपे साफ करावीत, खाद्य बाहेर फेकू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगावकर यांनी केले आहे.