लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडली. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर केल्याने नुकसानभरपाईसाठी वरोरा तालुक्याचा ७९ कोटी २३ लाखांचा निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे. यासाठी तलाठी व कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात बँक खाते क्रमांक अप्राप्त आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते क्रमांक जमा केले नाही, त्यांनी तत्काळ आपले बँक खाते पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स प्रत संबंधित गावाचे तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय, कोतवाल, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडे जमा करावे, अशा सूचना महसूल प्रशासनाने दिल्या.
ई-केवायसीचा अडथळाज्या शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झाले तसेच ई-केवायसी केली नाही त्यांनी तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते अद्ययावत करून घ्यावे. जेणेकरून, पीक नुकसानीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसल्याचे निदर्शनास आले. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल त्यांनी आजच ई-पीक पाहणी करून घ्यावी. जे शेतकरी ई-पीक पाहणी करणार नाही त्यांच्या सातबारावर पीडित पीक पाहणी दिसेल. परिणामी, त्यांना शासकीय अनुदान, पीक कर्ज आदींबाबत अडचणी निर्माण होतील.
शेतमाल विकताय; लाईव्ह फोटो अपलोड करा !चंद्रपूर : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी नोंदणी करताना सातबाराधारक शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे; परंतु शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याने धान व भरडधान्य खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीत शेतकरी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले.
१५ ऑक्टाेबर अंतिम मुदत१५ ऑक्टोबर २०२२ ही पीक पाहणीची अंतिम मुदत असल्याने मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी तत्काळ करून घ्यावी. वरोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले अद्ययावत बँक खाते क्रमांक, संमतीपत्र तलाठीकडे जमा करावे. जेणेकरून विहित मुदतीत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास तालुका प्रशासनास सोयीचे होईल, असे आवाहन वरोरा तहसीलदारांनी केले आहे.