ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या चिमूर, एकारा, सिंदेवाही जंगल परिसरात वर्ष २०११ ते २०१४ या वर्षात तीन बिबट्यांना जेरबंद करून ब्रह्मपुरीतील उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात ठेवण्यात आले होते. काल शनिवारी सकाळी तिन्ही बिबट्यांना वनविहार राष्ट्रीय उद्यान भोपाळ येथे पाठवण्यात आले आहे. यामुळे तब्बल तीन वर्षाने या बिबट्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येला पूर्णविराम मिळाला आहे.चिमूर वनपरिक्षेत्रामध्ये वर्ष २०११ मध्ये एका नरभक्षी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यांच्या हल्ल्यामध्ये पाच लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जनावरे जखमी झाले होते. वनविभागाने सदर बिबट्याला नरभक्षी घोषित करून जेरबंद केले. साडेतीन वर्षाच्या या नरभक्षी बिबट्याला १ नोव्हेंबर २०११ ला ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले.दुसरा बिबट सहा महिन्याचा असताना एकारा जंगल परिसरात आढळून आल्याने २० नोव्हेंबर २०१२ ला त्याला येथे आणले तर तिसरा बिबट घोट - सिंदेवाही परिसरात आईपासून विभक्त झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी ४ जून २०१४ ला ब्रह्मपुरीत आणण्यात आले. तेव्हापासून या तिन्ही बिबट्यांचा सांभाळ करण्याची जवाबदारी ब्रह्मपुरी उपवनसंरक्षक कार्यालयावर होती. सदर तिन्ही बिबट्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात ठेवण्यात आले होते.तिन्ही बिबट्याच्या आहारावर ६ लाख ८९ हजार चारशे रुपये, २ लाख ५८ हजार रुपये खर्च असा एकूण ९ लाख ४८ हजारांचा खर्च करण्यात आला होता. आता या बिबट्याचे पुनर्वसन होणार आहे. (प्रतिनिधी)
अखेर तीन बंदिस्त बिबट्यांची भोपाळ राष्ट्रीय उद्यानात रवानगी
By admin | Published: July 21, 2014 12:06 AM