सास्ती (चंद्रपूर) : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय प्रकल्पग्रस्त युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर भा.दं.वि.च्या कलम ३०६ अन्वये वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुल्लयाविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘लोकमत’ने ‘दीपालीच्या आरोपींवर कारवाई, आशाच्या पदरी निराशा का?’ या शीर्षकाखाली रविवारी वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी पुल्लया याला अद्याप अटक झालेली नाही.
आशा घटे ही प्रकल्पग्रस्त युवती वेकोलिचे क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुल्लया याच्याकडे नोकरीसंदर्भात वारंवार चकरा मारत होती. २२ मार्च रोजी याच कामासाठी ती जी. पुल्लया याच्याकडे गेली होती. दरम्यान, पुल्लयाने तिला अपमानास्पद वागणूक दिल्याने आशा निराश होऊन घरी परतली. हा अपमान असह्य झाल्याने टोकाचे पाऊल उलचत तिने विष प्राशन केले. २३ मार्च रोजी तिच्या पोटात दुखायला लागल्याने स्थानिक रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तिने विष प्राशन केल्याची कुठेही वाच्यता केली नाही. यानंतर २७ मार्च रोजी पुन्हा तिची प्रकृती खालावली. तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तपासाअंती आशाने विष प्राशन केल्याची बाब पुढे आली. तिच्या शरीरात विष पूर्णत: भिनल्याने प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती खालावतच होती. तिची मृत्यूशी झुंज सुरू असताना ३१ मार्च रोजी उपचारादरम्यान आशाची प्राणज्योत मालवली. २२ मार्च रोजी जी. पुल्लया या अधिकाऱ्याने अपमानित केल्यामुळेच आशाने आत्महत्या केली, अशी तक्रार तिचे वडील तुळशीराम घटे यांनी राजुरा पोलिसांकडे केली होती. आशाचा मृतदेह वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर ठेवून आशाच्या नातेवाइकांसह प्रकल्पग्रस्तांनी क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुल्लयाविरुद्ध कारवाईची मागणी केली. मात्र, पोलिसांनी प्रकरण बेदखल केले. कुठलीही कारवाई न करता अप्रत्यक्ष अधिकाऱ्यालाच वाचविण्याचा प्रयत्न झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित करताच राजुरा पोलिसांनी लगेच जी. पुल्लया या अधिकाऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. दरेकर करीत आहेत. पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नाही. आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी तेली समाज राजुरा व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आता अटक व्हायला किती दिवस लागणार?
आशा घटे या प्रकल्पग्रस्त युवतीच्या मृत्यूनंतर तब्बल चौथ्या दिवशी राजुरा पोलिसांनी जी. पुल्लया या वेकोलि अधिकाऱ्याविरुद्ध कलम ३०६ अन्वये आत्महत्येस परावृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करायला चार दिवस लावले. आता अटक करायला किती दिवस लावतात, याकडे प्रकल्ग्रस्तांसह सर्वांचे लक्ष लागले आहेत.
म्हणून आशा प्रकल्पग्रस्त
तुळशीराम घटे यांची शेती वेकोलिच्या पवनी-३ कोळसा खाणीसाठी अधिग्रहित करण्यात आली. तुळशीराम घटे यांनी वय वाढल्यामुळे मुलगी आशाला नोकरी द्यावी, यासाठी सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण केले. या आधारावर आशा वेकोलिचा क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुल्लया याच्याकडे पाठपुरावा करीत होती. दरम्यान, तिला अनेक वाईट अनुभव आल्याची बाब पुढे येत आहे.
बाॅक्स
वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांना तुच्छतेची वागणूक
वेकोलि अधिकाऱ्यांमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त चांगलेच त्रस्त झाले आहेत. स्वत:चीच शेती कोळसा खाणीसाठी दिल्यानंतरही अनावश्यक कागदपत्रांचा तगादा लावणे. त्याची पूर्तता न केल्यास पैशाची मागणी करणे, अरेरावीने बोलणे, दलालांना जवळ करून प्रकल्पात जमिनी गेलेल्यांना ऑफिसातून अपमानित करीत बाहेर काढणे, असे गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे प्रकल्पग्रस्त आता बोलू लागले आहेत. वेकोलिच्या असंख्य कोळसा खाणीत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. नवनवीन खाणीत जमिनी जात असल्यामुळे शेतकरी आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून येथे नोकरीसाठी येतात. गोरगरीब, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात असल्याचे पुढे येत आहे.