मनपा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू : राजकीय पक्षांनी केल्या याद्या जाहीर चंद्रपूर : मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी डोक्याला बाशिंग बांधले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे बाशिंग बांधून बसलेल्यांची अस्वस्थता शिगेला पोहचली होती. अखेर त्यांची अस्वस्थता आणि नागरिकांची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना, भाजपनेही आपली याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसची यादी रविवारी रात्री उशिरा जाहीर होण्याचे संकेत आहेत. २२ मार्च रोजी महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तेव्हापासून विविध राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ एप्रिल आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर भाजपानेही शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर पुन्हा भाजपाने रात्री उशिरा आपली दुसरी यादीही जाहीर केली. दरम्यान, काँग्रेसच्या यादीवर शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत जोरदार चर्चा झाली. चार ते पाच जागांवर निर्णय होऊ शकत नसल्याने यादी थांबवून ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, यावेळी भाजप आणि काँग्रेसकडे ६६ जागांसाठी शेकडो इच्छुकांची गर्दी उसळली होती. तिकीट वाटप करताना कार्यकर्ते नाराज होऊ नये, याची खबरदार घेतली जात असल्यानेही काँग्रेसच्या यादीला विलंब होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही राजकीय पक्षांनी आपल्या सर्व अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शनिवारी भाजपाने दोनदा काही तासाच्या कालावधीत आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र पूर्ण याद्या अद्यापही जाहीर झाल्या नसल्याने आज रविवारी दिवसभर कार्यकर्ते याद्यांबाबत कानोसा घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शिवसेनेनेही आपली यादी जाहीर केली. तत्पूर्वी दुपारीच काही उमेदवारांना शिवसेनेने एबी फार्म दिल्याची माहिती आहे. मनपा निवडणुकीसाठी ६६ जागांकरिता १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान तर २१ ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान ५ एप्रिल नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर खरे लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी) आघाडी फिस्कटली भाजपाला शह देण्यासाठी यंदाची मनपा निवडणूक आघाडी करून लढायची, असा विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाने केला होता. काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते यावर विचारविनिमय करण्यासाठी मुंबईला गेले. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चाही झाली. मात्र जागावाटपांबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षाच्या याद्याच घोषित झाल्या नाही. काँग्रेसकडे शेकडो उमेदवारी अर्ज आल्याने राष्ट्रवादीला मागणीप्रमाणे जागा कशा द्यावा, यावर रविवारपर्यंतही काँग्रेसकडून निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेली आघाडीची चर्चा संपुष्टात आल्याची माहिती आहे. असे आहेत शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून आज रविवारी शिवसेना उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. यात दे.गो.तुकूम प्रभाग-योगिता महेश मडावी (अनुसूचित जमाती), राहुल बबनराव विरूरटकर (ओबीसी), श्रुती घटे (सर्वसाधारण), शास्त्रीनगर प्रभाग-शैला पाटील (अनुसूचित जाती), सुरेश पचारे (ओबीसी), विद्या ठाकरे (सर्वसाधारण), ज्ञानेश्वर गरमडे (सर्वसाधारण), विवेकनगर प्रभाग- निता पुट्टेवार (एससी), छाया अय्यर (चौधरी) (ओबीसी), इंडस्ट्रियल प्रभाग-रुपा परसराम (एससी), अशोक यादव (सर्वसाधारण), वडगाव प्रभाग-वैष्णवी जोशी (सर्वसाधारण), राजेश नायडू (सर्वसाधारण), शंकर चौधरी (ओबीसी), नगिनाबाग प्रभाग- डॉ. भारती दुधानी (सर्वसाधारण), एकोरी प्रभाग-प्रविण मारोती लांडगे (एससी), इरफान शेख (सर्वसाधारण), भानापेठ प्रभाग-मालाताई पेंदाम (एसटी), इर्षद कानमपल्लीवार (ओबीसी), दुर्गाताई वैरागडे (सर्वसाधारण), पंकज आर्इंचवार (सर्वसाधारण), बाबुपेठ प्रभाग-भास्कर गहूकर (ओबीसी), रुपेश सुरेश प्रसादपांडे (सर्वसाधारण), हिंदूस्थान लालपेठ प्रभाग- विना खनके (सर्वसाधारण), डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग- साईराम आत्माराम मडावी (एसटी), वंदना हातगावकर (सर्वसाधारण) यांचा समावेश आहे. ६९ नामांकन दाखल २७ मार्चपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारणे सुरू झाले आहे. मात्र पहिल्या चार दिवसात एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. असे असले तरी अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करताना ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरून ठेवला आहे. आज रविवारी आॅनलाईन अर्ज भरून ठेवणाऱ्यांची संख्या ६४१ होती. याशिवाय शुक्रवार आणि
अखेर इच्छुकांची प्रतीक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 1:51 AM