वामनराव चटप : पालकमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे. परंतु, विषारी सापांच्या दंशाने तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्यास मृत्यू अटळ आहे. म्हणुन सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या अथवा नागरिकांच्या वारसांना इतर वन्य प्राण्यांप्रमाणे देय असलेली आर्थीक मदत देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेवून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. वानमनराव चटप यांनी राज्य सरकारकडे केली आहे.सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख दशरथ कान्होबा बोबडे साप चावून मरणाऱ्या शेतकऱ्यास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे आर्थिक अनुदान, मदत मिळावी, यासाठी वणी येथे उपोषण केले होते. त्यानंतर माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी ग्रामीण भागात अत्यंत जिव्हाळ्याची असलेली ही समस्या राज्याचे तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचकडे उपस्थित केली होती. तेव्हा अशी मदत दिली जाईल, असे डॉ. कदम यांनी घोषित केले होते. वनखात्याच्या उच्चस्तरीय समितीनेही आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. हा प्रस्ताव वनखात्याकडून अर्थ व नियोजन खात्याकडे आल्यानंतर इतर राज्यात काय व्यवस्था आहे, हे बघून शासनाने मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा शेऱ्यासह वनखात्याकडे प्रस्ताव परत आला होता. यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार येवून ३१ महीने झाले आहे. परंतु, या राज्यातील सत्ता परिवर्तनानंतरही अशी मदत देणारा शासन निर्णय अद्यापही झालेला नाही. याकडेही अॅड. चटप यांनी लक्ष केले आहे.राज्य सरकारने इतर वन्य प्राण्याप्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना न्यायोचित असलेली अथवा वन्य प्राण्यांप्रमाणेच देय असलेली आर्र्थिक मदत द्यावी. यासाठी सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून परिपत्रक काढावे, आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फ डणविस व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली आहे.
सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी
By admin | Published: June 22, 2017 12:43 AM