शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव दुकान, दूध व्यवसाय, आईस गोला, लस्सी सेंटर, ज्युस सेंटर व इतर व्यवसाय परिसरात सुरू केले होते. परंतु कोरोना या संकटामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असून आता तर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवरही मोठे संकट ओढावले आहे.
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामधून सावरत शेतकऱ्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवायास सुरुवात केली. परंतु सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तथा संचारबंदी लागू केली. शेतकरी शेतात असलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात लहान लहान दुकान थाटून व्यापारी पेक्षा कमी दरात नागरिकांना उपलब्ध करतो. मात्र आता सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाल्यांची दुकाने असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. उन्हाळा सुरू असून लग्न समारंभाला सुरुवात झाली होती व शेतातील भाजीपाला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात व लग्न समारंभामध्ये विकत असायचे. कोरोनामुळे मागील वर्षी व यावर्षीसुद्धा लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता येत नाही.
बॉक्स
आठवडे बाजारही बंद
शंकरपूरला दर सोमवारी आठवडे बाजार भरत असून परिसरातील २८ खेडी जोडलेली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे आठवडे बाजार भरवण्यावर बंदी असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेले वांगे, टाेमाॅटाे, पालक, सांबार, कांदे, गोबी, कारले, तसेच टरबूज व इतर भाजीपाल्यांची विक्री मंदावली आहे. शेतात राबराब राबून भाजीपाला पिकवायचा आणि तो शेतातच ठेवायचा, अशी स्थिती झाली आहे.
बॉक्स
उरलेला भाजीपाला जनावरांना
मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होऊनही तो विकता येत नसल्याने अनेक शेतकरी भाजीपाला जनावरांना चारणे किंवा फेकून देणे पसंत करत आहेत. आधीच दुष्काळ, नापिकी अशा सर्वच बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाने ही पुन्हा चिंतेत टाकण्याचे काम केले आहे. एकूणच मागील चार पाच वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या वक्रदृष्टीने तर कधी शेतकरी विरोधी धोरणामुळे आर्थिक विवंचनेत असताना आता या टाळेबंदीने पुन्हा त्याला आर्थिक संकटात ओढले आहे.
कोट
आज माझ्या शेतात पालक, चवळी, भेंडी, वांगे यासारखे भाजीपाला पीक घेतले आहे. परंतु ठोक व्यापारी खरेदीसाठी येत नाही. माल मोठ्या प्रमाणात निघत असल्याने तेवढा भाजीपाला चिल्लरमध्ये विकल्या जात नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
-स्वप्नील सावरकर, शेतकरी, शंकरपूर.