बफर झोन क्षेत्रातील प्रकार : इको डेव्हलपमेंट समितीचे पुरुषोत्तम मडावी यांचा आरोपमूल : बफरझोन वनपरिक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी जनतेला विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. मात्र त्या योजना भ्रष्टाचाराने प्रेरीत असल्याने जनतेचे आर्थिक शोषण केल्या जाते. असलाच प्रकार मूल वनपरिक्षेत्रातील करवन व काटवन वनपरिक्षेत्रात घडला आहे. गॅस कनेक्शन मिळाल्यानंतर काही वर्षानंतर घरी स्वयंपाक ओटा बांधकामासाठी दोन हजार रुपयाचे अनुदान वनविभागाकडून प्राप्त झाले. ओटा बांधकामानंतर आदिवासी लाभार्थ्यांना दोन हजार रुपयाचा धनादेश देण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये नगदी मागण्याचा तगादा वनरक्षक आर.डी. बत्तलवार यांनी लावला आहे. त्यामुळे आदिवासी जनतेचे आर्थिक शोषण करणाऱ्या अशा वनरक्षकावर कारवाई करण्याची मागणी इको डेव्हलपमेंट समितीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मडावी व माजी वनव्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम शेडमाके यांनी केली आहे.मूल वनपरिक्षेत्र हे बफर झोनमध्ये समाविष्ट असल्याने या गावात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी लोकांना वनविभाग विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहे. १०० टक्के आदिवासी असलेल्या करवन व काटवन या गावात आदिवासींना यापूर्वी वनविभागाकडून गॅस कनेक्शन देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वयंपाक करण्यासाठी ओटा मंजूर करण्यात आला. दोन हजार रुपये किंमतीचा ओटा बांधकाम केल्यानंतर वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आर.डी. बत्तलवार यांनी लाभार्थी आदिवासींना प्रत्येकी धनादेशामागे १०० रुपये नगदी दिल्याशिवाय धनादेश देण्यास टाळले. एवढ्यावरच वनरक्षक थांबले नाही तर प्रत्येकाकडून २५ किलो धान मागण्याचाही सपाटा सुरू केला, असा आरोप पुरूषोत्तम शेडमाके यांनी केला आहे. एकीकडे पैशाची मागणी तर दुसरीकडे धान्याची मागणी करून जनतेला लुटण्याचा गोरखधंदा वनरक्षकाने केल्याने काहींनी रोष व्यक्त केला. मात्र काहींनी निमूटपणे १०० रुपये व २५ किलो धान्य दिले. आदिवासींना विविध योजना देऊन समाजात जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जात असताना, शासकीय नोकरीत राहून अमाप पैसा कमविण्याचा गोरखधंदा वनरक्षक आर.डी. बत्तलवार यांनी चालविला आहे. या गंभीर बाबीकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेडमाके यांनी केला असून तीव्र नाराजी पसरली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनरक्षकाकडून आदिवासींचे आर्थिक शोषण
By admin | Published: January 21, 2017 12:45 AM