अनावश्यक खर्च दाखवून रक्कम कपात : संचालकाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
सिंदेवाही : सिंदेवाही खरेदी-विक्री सोसायटीमार्फत आधारभूत योजनेअंतर्गत हंगामातील धान खरेदी सुरू असून धान खरेदी करताना टोकन दिले जात नाही. खरेदीसाठी विलंब केला जातो. धान खरेदी केल्यानंतर बारदान, हमाली, धरम काटा ऑनलाइन प्रक्रिया व यासह विविध खर्च शेतकऱ्यांच्या बिलात जोडून रक्कम वसूल केली जाते. यातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होताना दिसत आहे. यासंदर्भात शेतकरी व खरेदी-विक्री सोसायटीचे संचालक चंद्रभूषण जैस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
धान केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच किलो धान कपात केली जाते. धान कट्टा पलटी २० रुपये, गोडाऊन भाडे १० रुपये, हमाली १० रुपये घेतली जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्याची यामध्ये संमती नसते. शेतकऱ्याला धमकावले जाते की तुझे धान घेतले जाणार नाही. त्यामुळे शेतकरी मुकाट्याने संमती देतो. खरेदी-विक्री सोसायटीमध्ये मागील एक वर्षात पाच ते सहा हजार क्विंटल धान खरेदी केली गेली. काही गोदामात तर काही सोसायटीच्या आवारात ठेवले होते. झालेल्या पावसाने आवारातील संपूर्ण धान ओले होऊन फेकण्यात आले. यामध्ये सोसायटीला दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तरीपण याची चौकशी झाली नाही. सोसायटीचा ठराव न घेता जाटलापूर येथे गोडाऊन नऊ हजार रुपयेप्रमाणे किरायाने घेण्यात आले. पण गोडाऊनचा किराया शेतकऱ्याकडून कापला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी खरेदी-विक्री सोसायटीचे संचालक चंद्रभूषण जैस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.