लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहनाच्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करुनच वाहन चालवावे, याबाबत वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवित असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तीन कोटी १४ लाख ५७ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन स्वत:सह इतराचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मट, विनापरवाना, ट्रीपलसीट, मोबाईलवर बोलणे आदी विविध वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी अलीकडेच सुरु झालेली आहे. यादरम्यान वाहनचालक तीनदा विनाहेल्मेट आढळून आल्यास चक्क परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकाला मोठे महागात पडणार आहे.
नवीन कायद्याची अंमलबजावणीकेंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात अलीकडेच सुरु झाली आहे. या कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तीनदा विनाहेल्मेट आढळून आल्यास परवानाच रद्द होणार आहे.
लॉकडाऊनमुळे दंडवसुली घटली कोरोनामुळे मागील दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे बंद होते. त्यामुळे दंडवसुली घटली होती. मात्र पुन्हा कारवाई सुरु केली आहे.
नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास दंडाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार नाही. आता नव्या मोटार वाहन कायद्याची अमंलबजावणी सुरु झाल्याने दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. परवाना रद्दसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.-प्रवीणकुमार पाटील, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर