सावली : तालुका प्रशासनाने कोरोनाला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने १८ पथकांचे गठण केले आहे. या पथकाने दोन दिवस विशेष मोहीम राबवून विनामास्क फिरणाऱ्या १३६ जणांवर कारवाई करून ६३ हजार ४०० रुपयांचा दंड आकारला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. तहसीलदार परिक्षित पाटील यांनी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग व पोलीस विभाग यांचे १८ पथक गठित केले. या पथकांकडून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करुन त्यांना मास्क घालण्याचे सक्त निर्देश देण्यात येत आहेत. दोन दिवसांत १३६ जणांवर कारवाई करून ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई तहसीलदार परिक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावडे, मुख्याधिकारी मनीषा वजाडे, पोलीस निरीक्षक राठोड, सहायक पोलीस निरीक्षक बन्सोड यांनी केली.
कोट
कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखता येईल. नागरिकांकडून दंड वसुली करणे हा उद्देश नसून, नागरिकांना मास्क वापरण्याची सवय लागावी, यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
परिक्षित पाटील,
तहसीलदार, सावली