अनेक समस्याही मांडल्या : अरूण धोटे यांचे प्रदेशाध्यक्षांना साकडेराजुरा : येथील काँग्रेस पक्ष आणखी मजबुत व बळकट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपवा, असे साकडे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष अॅड. अरुण धोटे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घातले.माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी राजुरा येथे आले असताना अॅड. अरुण धोटे यांनी त्यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात व केंद्रात भाजपचे सरकार आलेले आहे. परंतु सत्ता आल्यानंतरसुद्धा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने नेत्यांना व कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची सवय राहिलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी गटबाजी संपविणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सत्ता गेली तरी गटबाजी संपलेली नाही, ही काँग्रेसजनासाठी अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात शालेय जीवनापासून काँग्रेस पक्षाचे आपण काम करीत आहोत व काँग्रेस पक्षाच्या अनेक पदावर पूर्वीपासून काम केलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा मजबुतीने उभा राहावा असे वाटते, असे मत अॅड. अरुण धोटे यांनी व्यक्त केले.मागील दोन महिन्यापासून सतत पडलेल्या पावसामुळे बल्लारपूर ते राजुरा तसेच राजुरा ते गडचांदूर रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सदर खड्डयावरील रस्ते त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना व जिवती भागात मोठ्या प्रमाणात वनजमिनीवर शेतकरी अनेक वर्षांपासून शेती करीत आहे. परंतु नवीन शासन शेतकऱ्यांना वनजमिनीवरुन हटवून जमीन ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल. जुन्या सरकारने वनजमिनीवर शेतकऱ्यांना पट्टे देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वनजमिनीवरील शेतकऱ्यांना त्वरीत पट्टे देण्यात यावे, ही मागणी शासनदरबारी लावून धरावी.राजुरा येथे मागील चार महिन्यापासून उपविभागीय अधिकारी यांचे पद रिक्त असून अतिरिक्त भार तहसीलदार यांच्याकडे आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकरणे प्रलंबित असून त्यांना निकाल लागलेला नाही. तसेच शेतकऱ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक महसुली विभागात करण्यात यावी.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतरसुद्धा प्रचंड प्रमाणात दारुची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे तरुण मुले व्यसनाधिन झालेले आहे व अनेक तरुण अवैध दारुच्या व्यवसायात गुंतलेले आहे. दारुची अवैध विक्री शासकीय व राजकीय आशिर्वादाने सुरू आहे. ही अवैध विक्री त्वरीत बंद करण्यात यावी.काँग्रेस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी कर्ज माफ केले होते. अजूनही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतमालाला योग्य तो हमीभाव दिला नाही. अगोदर दुष्काळाने शेतीचे नुकसान झाले व आता जास्त पावसाने नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून खर्च केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्जसाठी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करावी, अशी मागणी अॅड. अरुण धोटे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी तत्काळ संपवा
By admin | Published: October 09, 2016 1:30 AM