गोलबाजारातील घटना : २० लाखाच्या नुकसानीचा अंदाजचंद्रपूर : येथील गोलबाजार परिसरात असलेल्या एका रेडिमेड कापड दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर कपडे जळून खाक झाले. हे नुकसान १५ ते २० लाखाच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील गोलबाजार परिसरातील पोटदुखे यांच्या चक्कीजवळ पंकज मंधानी यांचे रेडिमेड कापड केंद्र आहे. रात्री १.३० वाजताच्या सुमारास या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याची बाब आजुबाजूच्या काही नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने शहर पोलीस व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला आगीसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पहाटे ५ वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत रेडिमेड कपड्यांसह दुकानातील फर्निचरही मोठ्या प्रमाणावर जळून भस्मसात झाले. (प्रतिनिधी)वीज पुरवठा खंडीतकापड दुकानाला लागलेल्या आगीनंतर वीज वितरण कंपनीला अर्ध्या शहरातील वीज पुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे वीज पुरवठा सुरू होईस्तोवर नागरिकांना उकाड्यामुळे घराबाहेर येऊन थांबावे लागले. रात्री १.३० वाजता बंद झालेला वीज पुरवठा पहाटे ३ वाजता सुरू झाला. अतिक्रमणाचा अडथळागोलबाजार परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. सोमवारी रात्री जेव्हा आग लागली, तेव्हा अग्निशमन दलाचे वाहन गोलबाजार परिसरात पोहचले, तेव्हा अतिक्रमणामुळे वाहनाला जाण्यास अनेक अडथळे पार करावे लागले. महानगर पालिकेने गोलबाजारातील अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.