आॅनलाईन लोकमतवरोरा : येथील रेल्वे स्थानकात मागील दोन दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वे वॅगनमधील कोळशाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने चांगलीच तारांबळ उडाली. अखेर अग्निशमन दलाने पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.वरोरा रेल्वे स्थानकावर मागील दोन दिवसांपासून कोळसा भरलेले पाच डब्बे असलेली वॅगन मुख्य रेल्वे मार्गाच्या बाजूला उभी होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका वॅगनमधील कोळशाला अचानक आग लागली. प्रारंभी तेथे उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग वाढत जावून पाचही वॅगनला लागण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर साई वर्धा पॉवर कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. साई वर्धा पॉवरच्या अग्निशमन दलाचे प्रफुल्ल दांडेकर, दिलीप मांडवकर, सचिन महाकूलकर, गणेश खडसंगे, विक्रम लोडेकर आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर कोळसा कुठे चालला होता, ही माहिती कळू शकली नाही.
वरोऱ्यात कोळसा वॅगनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:54 PM