दोन लाखांचे नुकसान : सिंचनाचे साहित्यही जळाले आवारपूर : कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कढोली येथील सधन शेतकरी नामदेव ढेंगळे यांच्या शेतात माल साठविण्यासाठी व जनावरांसाठी त्यांनी गोठा तयार केला होता. परंतु गुरूवारी अचानक या गोठ्याला आग आगली. त्यात संपूर्ण गोठा हा भस्मसात झाला. या घटनेत जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील जनावरांची सुटका केली. मात्र त्यात असलेले शेतीची अवजारे व सिंचनाचे साहित्य, ओलिताची पाईप लाईन पूर्णत: जळून खाक झाली. आगीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. जनावराच्या चाऱ्याचे आणि ओलीताच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने ढेंगळे यांच्यावर संकट कोसळले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. आगीचे कारण कळू शकले नाही. या आगीमुळे भोवतालचे शेतकरीसुद्धा भयभीत झाले होते. काही दिवसातच शेतीचा हंगाम चालू होत आहे. परंत त्यांना शेतीचे अवजारे व ओलिताची साहित्य घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नामदेव ढेंगळे व गावकऱ्यांनी केली आहे. ढोरपा येथे तणसाच्या ढिगांना आग नागभीड : तालुक्यातील ढोरपा येथे शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने ४ शेतकऱ्यांचे तणसाचे ढीग जळून खाक झाले हे ढीग गावाशेजारीच असल्याने गावकऱ्यांची पळता भूई थोडी झाली होती.आग लागल्याचे दिसून येताच येथील तहसील कार्यालयाला माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार वक्ते यांनी लागलीच घटनास्थळ गाठले. ब्रह्मपुरी येथील अग्नीशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्नीशमन येईपर्यंत गावकरीच आग आटोक्यात आणत होत अग्नीशमन दलाने उर्वरीत आग विझवली.या आगीत फाल्गुन राऊत, सुखदेव राऊत, मारोती बागडे, रामचंद्र राऊत यांची तणसीची ढिग जळून खाक झाले. घटनास्थळी नागभीड पं.स.चे उपसभापती प्रफुल्ल खापर्डे यांनी भेट दिली.
आगीत जनावरंचा गोठा भस्मसात
By admin | Published: April 22, 2017 1:05 AM