चंद्रपूर : येथील बस स्थानकाच्या समोर असलेल्या प्रशासकीय भवनाला आग लागल्याची घटना रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रपूर मनपा व महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. दोन्ही विभागांच्या मिळून सुमारे 8 अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले आहेत. ही आग दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला लागली आहे. या कार्यालयात कारवाई करून जप्त करण्यात आलेले अवैध तंबाखू, अंमली पदार्थ व इतर प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. यातील बरेच साहित्य व कागदपत्रे आगीत जळून राख झाली असण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय भवन या इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. ज्याठिकाणी दररोज शेकडो लोक शासकीय कामाकरीता येत असतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा माहिती अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग ही महत्त्वाची कार्यालये या इमारतीत असुन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. महत्वाचे म्हणजे या इमारतीच्या अगदी शेजारीच जिल्हा न्यायालय, दुसऱ्या बाजुला रामनगर पोलीस ठाणे, मागील बाजुला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने हा परिसर महत्त्वाचा व संवेदनशील समजल्या जातो.
पहाटे फिरण्यास निघालेल्या नागरिकांना प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या मजल्यातून मोठ्या प्रमाणात धुर निघत असल्याचे दिसल्याने त्यांनी शहानिशा केली असता तिथे आग लागल्याचे निष्पन्न झाले. काही जागरूक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळवली. आगीची तीव्रता व इमारतीचे महत्त्व लक्षात घेता मनपा व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे नेमके कारण व वेळ अजून स्पष्ट झालेली नाही.