तीन तासानंतर आगीवर नियंत्रण : २५ लाखांचे नुकसानचंद्र्रपूर : येथील गांधी चौक ते जटपुरा मार्गावर असलेल्या चांडक मेडिकल स्टोअर्सला आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या आगीमध्ये किमान २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.जटपुरा मार्गावरील चांडक मेडिकल स्टोअर्सच्या वरील माळ्यावर औषधांचा साठा आहे. येथे अचानक आग लागली. सकाळी वरच्या माळ्यामधून धूर निघत असताना नागरिकांना दिसताच याबाबतची माहिती मेडिकल चालकांना देण्यात आली. १० वाजता मेडिकलचे शटर उघडून बघितले असता आगीत अनेक औषधी जळाल्या असल्याचे निदर्शनास आले. मेडिकलचे संचालक दिलीप चांडक यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने तब्बल तीन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्ट सर्किटमूळे मेडिकलला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधीसाठा जळाला. काही दिवसापूर्वी येथील रघुवंशी कॉम्प्लेक्सला आग लागली होती. विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश मोठ्या इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने अशा घटना दिवसेंदिवस घडत आहे. मात्र महानगरपालिका कारवाई करण्याचे टाळत आहे. (नगर प्रतिनिधी)
मेडिकलला आग
By admin | Published: January 13, 2015 10:56 PM