लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला आहे. गुरुवारी ४५.३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. बुधवारी ४५.४ अंश सेल्सीयस तापमान होते. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून याचा जनजीवनावरही परिणाम पडत आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तिव्रतेने उभा ठाकला आहे.‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यातही फारसे तापमान नव्हते. होळी झाल्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहत असल्याने वातावरणात काही दिवस गारवा होता. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापासून ऊन्ह तापू लागले. मागील चार दिवसांपासून तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी ४३.६, बुधवारी ४५.४ आणि आज गुरुवारी ४५.३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.आता एप्रिल महिना लागताच सुर्याने आपला प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. एकूणच नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे.
‘मे’ हीटचा धसकाएप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यातच सुर्याने आग ओकणे सुरू केले आहे. तप्त सुर्यकिरणे असह्य होत आहेत. एप्रिल महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.
ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षजसजसे उन्ह तापू लागले आहे, तसे जलाशय, नदी, तलाव-बोड्यातील पाणी आटू लागले आहे. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. एका गावातील एकाच विहिरीवर दोन गावातील गावकºयांना तहान भागवावी लागत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.
उन्हापासून बचावउन्हापासून बचाव करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढविल्या जात आहे. तोंडाला दुपट्टा बांधल्याशिवाय कुणीच बाहेर निघत नाही. त्यामुळे दुपट्यांच्या दुकानांना सुगीचे दिवस आले आहे. ठिकठिकाणी ऊसाचा रस, नारळ पाणी, ताड, लिंबू पाणी यांची दुकाने लागली आहेत. थंडा आईस गोला, कुल्फी यांचीही दुकाने रस्त्यावर दिसून येत असून या दुकानांमध्ये नागरिकांचीही झुंबड दिसून येत आहे.
सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोकामागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाºया काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. ४७ ते ४९ अंश सेल्सीयस तापमानात पक्ष्यांना पाणी मिळाले नाही तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
महापालिकेचे आवाहनयेत्या काही दिवसात चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानात नागरिकांनी विशेषत: वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल कपडे घालावे, थंड वातावरणात रहावे, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे, अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे उष्माघाताची असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी, थंड जागेत आराम करावा, भरपूर थंड पाणी प्यावे किंवा लिंबू पाणी, आंब्याचे पन्हे प्यावे, परिश्रमाचे काम करू नये, मनपा आरोग्य केंद्रात वा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.