गरजूंना वाटप : स्वामीकृपा बहुद्देशिय संस्थेचा पुढाकारचंद्रपूर : सर्वसामान्य गरीब अनेकदा दोन वेळच्या जेवणासाठी मौताद असतात. अशावेळी अंगभर कपडे आणणार कुठून? एकीकडे श्रीमंताच्या घरात कपड्यांचे ढिगारे तर दुसरीकडे गरिबांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नाहीत, अशी विषम व्यवस्थेने विषण्ण झालेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने गरीबांना अंगभर कपडे मिळावेत म्हणून चंद्रपुरात चक्क कपडा बँक उघडली. त्याद्वारे गरीब गरजूंना कपड्यांचे वाटप करण्यात येत आहे.प्रा.प्रफुल्ल पुलगमवार असे त्या भल्या माणसाचे नाव. स्वामीकृपा बहुद्देशिय संस्थेंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या प्रा. पुलगमवार यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या गरीब मजुरांची अवस्था पाहिली. भर उन्हात अंगभर कपडे नाहीत. एकाच कपड्याच्या जोडीवर दिवस काढणारी माणसेही त्यांच्या नजरेतून सुटली नाहीत. ही परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावले. या लोकांसाठी काय करता येईल, हा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच त्यांना कपडा बँकेची अनोखी कल्पना सुचली. त्यावर मंथन केले आणि थेट हा उपक्रम सुरू केला. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या भागविण्यासाठी ऊन्ह, वारा, पावसात सामान्य गरीब माणूस राबत असतो. त्यात वस्त्रांची गरज भागविताना काही धनाढ्य लोक हजारो रुपये खर्च करतात, तर काहींजवळ एक जोडी कपडे घेण्याचीही सोय नसते. ही बाब लक्षात घेऊन कपडा बँक उपक्रमासाठी प्रा.प्रफुल्ल पुलगमवार यांनी मागील आठवड्यात पठाणपुरा परिसरात तीन दिवसांसाठी बँक उघडली. ज्या लोकांजवळ जुने वापरण्यायोग्य कपडे असतील, त्यांनी ते संस्थेच्या कपडा बँकेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन ध्वनीक्षेपक तसेच पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले. या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन या बँकेत जुने कपडे पोहचविले. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला असून हा उपक्रम कायमस्वरूपी ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे. (प्रतिनिधी)
चंद्रपुरात उघडली पहिला कपडा बँक
By admin | Published: June 04, 2016 12:44 AM