सिंदेवाही : पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर डबके तयार होऊन ठिकठिकाणी चिखल तयार झाला आहे. यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. चिखलामुळे वाहने घसरत आहे. यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. शहरातील डॉ. बंडावार दवाखान्यासमोर, गांधी चौक, महाविद्यालय मार्ग, तहसील मार्गावर खड्डे पडून पाण्याचे डबके तयार झाले आहे. हा रस्ता अरुंद आहे. पाणी आणि चिखलामुळे रस्ता त्रासदायक झाला आहे. साधे चालताही येत नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. आधीच नागरिकांत आरोग्यविषयक भीती आहे. आता साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यासोबतच निर्जंतुकीकरण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. अतिक्रमण केलेल्या भूखंडावरही कचऱ्याचे साम्राज्य असून डबके तयार झाले आहे. त्यांनासुद्धा नोटीस बजावून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
पहिल्याच पावसात सिंदेवाहीतील रस्त्यांची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:37 AM