लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रेशन दुकानात ई-पॉस मशीनमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून अनेक वेळा धान्याविना परतण्याची वेळ लाभार्थ्यांवर येते. विशेष करून वयोवृद्धांचे ठसे जुळतच नाही. आता मात्र धान्याविना परतण्याची वेळ कोणालाच येणार नाही. यासाठी आधारबेस फोर जी ई- पॉस मशीन प्रत्येक रेशन दुकानात लागणार आहे. यामध्ये आय स्कॅनरची सुविधा उपलब्ध राहणार असून, फोर जीची स्पीडसुद्धा राहणार आहे. त्यामुळे रेशनसाठी ताटकळत राहण्याची समस्या आता दूर होणार आहे.
यापूर्वी टू जी ई-पॉसमुळे रेशन दुकानदारांसह शिधापत्रिकाधारकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे या मशीन बदलण्यात येऊन नव्याने चांगल्या गतीच्या मशीन व आय स्कॅनरची सुविधा देण्याची मागणी रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांकडूनही केली जात होती. त्यानंतर आता शासनाने या रेशन दुकानांमध्ये फोन जी ई-पॉस मशीन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील काही दिवसांमध्ये प्रत्येक दुकानात फोर जी ई-पॉस मशीन दिसणार आहे.
धान्य वितरण प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासोबतच गतिमानता वाढण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांचाही वेळ वाचणार आहे.
शिधापत्रिकाधारकांना मिळणार ही सुविधा फोर जी ई-पॉस मशीनद्वारे आधारबेस ऑनलाइन प्रणाली तयार झाली आहे. यात दैनिक विक्री, मासिक विक्री, 'वन नेशन-वन रेशन' अंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारक उपलब्ध आहेत. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीमध्ये येणाऱ्या अडचणीही फोर जी ई-पॉस प्रणालीमध्ये दूर होणार आहेत. याद्वारे कुठलाही रेशनधारक कुठल्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकणार आहे. अन्य सुविधांचा लाभ रेशन दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
१५३४ रेशन दुकानात लागणार फोर जी ई-पॉस मशीनजिल्ह्यातील १ हजार ५३४ रेशन दुकानामंध्ये या मशीन लागणार आहेत. यासाठी पुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. यामध्ये बल्लारपूर ६६, भद्रावती १०२, चंद्रपूर ७९, ब्रह्मपुरी १२१, चंद्रपूर शहर ९७, चिमूर १४१, गोंडपिपरी ८६, जिवती ८९, कोरपना ९७, मूल ६७, नागभीड ११८, पोंभूर्णा ५५, राजुरा १०८, सावली ८५, सिंदेवाही ९५, वरोरा १३० रेशन दुकानांचा समावेश आहे.