मुंबई : विदर्भातील तापी, वैनगंगा, इंद्रावती अशा नद्यांमध्ये पाणमांजर म्हणजेच, आॅटर या दुर्मीळ जलचर सस्तन प्राण्यांचे अस्तित्व फार पूर्वी होते. मात्र, अलीकडे नद्या कोरड्या पडल्यामुळे आणि जलप्रदूषणामुळे हा जलचर प्राणी अतिशय दुर्मीळ झाला आहे. परिणामी, विदर्भात कोठेच या प्राण्याची नोंद होत नाही. मात्र, नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यात पाणमांजराची (स्मूथ कोटेड आॅटर) नोंद झाली असून, याचे छायाचित्रही प्रथमच मिळाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एका नदी पात्रात आपल्या नियमित पक्षी अभ्यासादरम्यान हा प्राणी आढळून आला आहे. त्याचे छायाचित्रे घेण्यात वन्यजीव छायाचित्रकार लतीश डेकाटे आणि वन्यजीव अभ्यासक अंकित बाकडे यांना यश आले. छायाचित्रे डॉ.जयंत वडतकर आणि वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे आदित्य जोशी यांना पाठविल्यानंतर त्यांनी ते स्मूथ कोटेड आॅटर असल्याचे निश्चित केले. स्मूथ कोटेड आॅटर स्थानिक किंवा मराठीत पाणमांजर, तसेच हुदळे नावाने ओळखले जाते. ही प्रजाती धोकाग्रस्त श्रेणीमध्ये समाविष्ट झाली आहे, अशी माहिती लतीश डेकाटे यांनी दिली.
चंद्रपूर येथील ही नोंद महत्त्वपूर्ण आहे. या प्राण्याचे छायाचित्रमिळणे फारच दुर्मीळ असल्याचे मत वन्यजीव अभ्यासक डॉ.जयंत वडतकर यांनी व्यक्त केले. या दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांचे अस्तित्व टिकून ठेवायचे असल्यास त्यांचे अधिवास अबाधित राखणे आवश्यक आहे. सोबतच त्यांचा जीव वाचविण्यासाठी शिकार होऊ नये, याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे अदित्य जोशीयांनी सांगितले.अशी करा पाणमांजराची ओळखदेशात ही प्रजाती दुर्मीळ असली, तरी सर्वत्र आढळते. अंगावर करड्या रंगाचा मऊशार केसांचा कोट आणि जबड्याच्या खालील भागापासून ते गळ्यापर्यंतचा पांढरा रंग, यामुळे ही प्रजाती सहज ओळखता येते. नाकावरच्या इंग्रजी व्हीप्रमाणे रंगाच्या खुणेमुळेसुद्धा ही प्रजाती ओळखणे सहज सोपे असते.पाणमांजराच्या मुख्य तीन प्रजातीदेशात या पाणमांजरांच्या स्मूथ कोटेड आॅटर, आशियन स्मॉल क्लॉ आॅटर आणि युरेशियन आॅटर या तीन प्रजाती आढळतात. यापैकी मध्य भारतात फक्त स्मूथ कोटेड आॅटर ही प्रजाती आढळत असून, अलीकडेच मध्य प्रदेशात युरेसियन आॅटर या प्रजातीची डब्ल्यूसीटीचे शास्त्रज्ञ आदित्य जोशी यांनी नोंद केली आहे.