चंद्रपूर : येत्या काळात शेत तेथे मत्स्यतळे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक चांगला जोडधंदा उपलब्ध होईल. मत्स्य व्यवसायात रोजगार देण्याची मोठी क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सावली तालुक्यातील पेंढरी (मक्ता) येथे एन.के. ॲक्वाकल्चर मत्स्यबीज केंद्र येथे मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मत्स्य महोत्सव व कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर खासदार अशोक नेते, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, माजी आमदार अतुल देशकर, मत्स्यव्यवसाय (भुजल) विभागाचे सहआयुक्त रवींद्र वायडा, डॉ. दिलीप शिवरकर, एन.के. ॲक्वाकल्चरचे निनाद गड्डमवार उपस्थित होते.
पेंढरी (मक्ता) येथे निनाद गड्डमवार यांच्या ८० एकरातील मत्स्यपालन केंद्र इतरांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याकडे ८२ कोटी बोटुकलीची आवश्यकता असतांना केवळ ११ कोटी बोटुकली तयार होते. चंद्रपूर – गडचिरोली हा बारमाही नद्यांचा प्रदेश आहे. येथील झिंगे अतिशय स्वादिष्ट आहे. इनलॅण्ड फिशींग कायद्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या माध्यमातून मत्स्य सहकारी संस्थांना मदत होईल. हा विभाग आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी समुद्रात जेथे बांधकाम केले जाते, त्या किमतीच्या २ टक्के निधी मत्स्य विभागाला देण्याचे बंधनकारक केले आहे. शेत तेथे मत्स्यतळे हा शेतकऱ्यांसाठी एक जोडधंदा होऊ शकतो. रोजगार उपलब्ध होण्याची मोठी संधी या व्यवसायात आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी आमदार वडेट्टीवार म्हणाले, दूरदृष्टी ठेवून कोणत्याही विभागाचा कायापालट करण्याची क्षमता पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यामध्ये आहे. कल्पनेच्या पलिकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो, हे या कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसते. कोळी समाजाच्या समस्या सोडवून या समाजाची प्रगती करण्याची मागणी त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली. संचालन एकता बंडावार यांनी केले.