चारगाव ओव्हरफ्लो : आठ तासानंतरही पाण्याची पातळी २०७.५०० एवढीच आहेदुर्गापूर : संततधार पावसामुळे इरई धरण तुडुंब भरले असून चारगाव धरणातील पाणी धरणात येत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडून आठ तासांचा कालावधी लोटला.परंतु पातळी २०७.५०० एवढीच आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाने २०७.५०० मीटर पाण्याची पातळी गाठली. याशिवाय चारगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्याचे सारे पाणी इरई धरणात येत आहे. सातत्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. तरीही पाण्याची पातळी कमी होत नसल्याने दुपारी १ वाजता पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत असतानाही पातळी कमी झाली नाही. परिणामी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने वाढविण्यात आले आहे. सध्या पाचही दरवाजे एक मीटरने उघडे असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अद्यापही पाण्याची पातळी २०७.५०० मीटर एवढीच स्थिर आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यास पुन्हा दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
इरई धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडले
By admin | Published: September 19, 2015 1:08 AM