लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या संपत्तीचा फायदा घेत माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक, मुर्ली अॅग्रो, हरिगंगा या पाच सिमेंट कंपन्यांनी तालुक्यात कारखाने उभे केले. या सिमेंट कंपन्यांच्या स्थापनेमुळे आता दोन्ही तालुके भरभराटीस येतील आणि स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा होती. मात्र, या उद्योगांमध्ये कंपनी व्यवस्थापनांनी परप्रांतीयाचाच भरणा केल्याने मोठे उद्योग असूनही या भागातील युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे.बेरोजगारीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेक उच्चशिक्षित तरुण कामाच्या शोधात मुंबई, पुणेकडे जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोरपना आणि राजुरा तालुक्यात असलेल्या खनिज साधनसंपत्तीचा फायदा घेत १९८० पासून या दोन्ही तालुक्यात सिमेंट कंपन्या उभारण्यात आल्या. उद्योगासाठी लागणारी शेतजमिनी कवडीमोल भावात संपादित करण्यात आल्या. तालुक्यात सिमेंट उद्योग येणार असल्यामुळे आपल्या हाताला काम मिळेल, अशी आशा येथील तरुणांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपाल्या सुपिक जमिनी कंपनीला दिल्या. मात्र आजघडीला ३० ते ३५ वर्षांचा कालावधी लोटत असतानाही स्थानिक बेरोजगारांना कंपनीत सामावून घेण्यात आले नाही. कंपनीने शेती संपादित केल्यामुळे आता येथील शेतकऱ्यांजवळ कसण्यासाठी शेतीही उरली नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढतच गेली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने परप्रांतीयांचा भरणा करुन स्थानिकांवर अन्याय केला. आपल्या पोटाची भाकर असलेली शेती कंपनीला दिली. कंपनीने कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन देत अल्पदरात जमिनी घेतल्या. मात्र, अद्यापही येथील तरुणांना कंपनीत नोकरी देण्यात आली नाही. शेवटी येथील शेतकऱ्यांना न्यायालयाच्या पायºया चढाव्या लागल्या. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने नोकरभरती प्रक्रियेत आमुलाग्र बदल करीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा डावलले.परिसरातील विविध गावांमध्ये अनेक युवक- युवती अभियंता, पदवी, आयटीआय यासारखे कौशल्यआधारीत शिक्षण घेवून नोकरीची वाट बघत आहे. मात्र, कंपनीच्या हेकेखोरपणामुळे हे सुशिक्षित तरुण मुंबई आणि पुणे येथे नोकरीच्या शोधात जात असल्याच ेचित्र दिसून येत आहे. स्थानिक कारखान्यांमध्ये अतिरिक्त काम निघाल्यास केवळ महिना दोन महिने ३०० ते ३५० रुपये रोजमजुरीने स्थानिकांना रोजगार या नावाखाली काम देण्यात येते. त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात येते. यातही संबंधित ठेकेदाराकडून स्थानिकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. त्यातच ठेकेदार बाहेर प्रांतातून कामगार आणून त्यांना मात्र कंपनीत सामावून घेतले जात आहे. अद्यापही स्थानिकांना या कंपन्यांमध्ये सामावून घेण्यात आले नाही. कंपनी व्यवस्थापनाच्या अधिनस्थ असलेल्या अनेक आस्थापनेत आजमितीस एकही स्थानिक उमेदवार दिसून येत नाही. यावरुन कंपनी व्यवस्थापन स्थानिकांना डावलत असल्याचे समजते. कंपनी व्यवस्थापनाकडून विविध आस्थापनेत निघालेल्या भरती प्रक्रियेचा कानोसासुद्धा स्थानिक उमेदवारांना लागत नाही. अनेक अनुभवशून्य उमेदवारांची भरती जोरात असून भारतातील विविध प्रांताचा माणूस मोठ्या संख्येत तालुक्यात पहायला मिळत आहे. स्थानिक युवक मात्र इतरत्र फिरत आहे.
पाच कारखाने; तरीही बेरोजगारीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:59 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या संपत्तीचा फायदा घेत माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक, मुर्ली अॅग्रो, हरिगंगा या पाच सिमेंट कंपन्यांनी तालुक्यात कारखाने उभे केले.
ठळक मुद्देयुवकांमध्ये असंतोष: राजुरा, कोरपन्यातील उच्चशिक्षितांची कंपन्यांकडून थट्टा