वरोरा : आजपावेतो बकरी दोन किंवा जास्तीत जास्त तीन पिलांना जन्म देत होती. परंतु वरोरा तालुक्यातील शेगाव येथे एका बकरीने एकाच वेळी पाच पिलांना जन्म देऊन संशोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. पाच पिल्ले व त्यांच्या मातेची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) येथील हनुमान वॉर्डात राहणाऱ्या शारदा प्रभाकर दडमल यांचा मागील कित्येक वर्षापासून बकरी पालन व्यवसाय आहे. बकरी पालन व्यवसाय जोडधंदा म्हणून करीत असल्याने त्यांना त्यातून चांगले आर्थिक उत्पन्नही होत आहे. २५ डिसेंबर रोजी त्यांच्या बकऱ्यांच्या कळपातील एका बकरीने तब्बल पाच पिलांना जन्म दिला. त्यात चार बकरी तर एक बोकडाचा समावेश आहे. ही बकरी कुठुनही विकत घेतली नसून कळपातील परंपरागत पद्धतीमध्ये वाढली आहे. या बकरीने यापूर्वी दोनच पिल्लांना एका वेळी जन्म दिला. सध्या तिने एकाच वेळी पाच पिलांना जन्म दिल्याने बघणाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. जर अशा प्रकारच्या बकरीचे संकरीत वाण शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी जोडधंदा म्हणून त्या पाळतील व त्यातून त्यांना चांगला आर्थिक लाभ होईल, जाणकारांचे मत आहे. (तालुका प्रतिनिधी)
बकरीने दिला पाच पिलांना जन्म
By admin | Published: December 29, 2014 1:13 AM