विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन : अखेर त्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारा, अन्यथा पकडा अशा मागणीसाठी भयग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात तब्बल पाच तास ठिय्या मांडला. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी आश्वासनातून हमी देण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. वडेट्टीवार यांनी जोपर्यंत ठार मारण्याचे आदेश येत नाही, तोपर्यंत येथून हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केल्याने वनविभागासमोर पेच निर्माण झाला. दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले ठिय्या आंदोलन सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत सुरूच होते. अखेर पाच तासानंतर म्हणजे रात्री ७.४५ वाजता वाघाला ठार मारण्याचे आदेश धडकले आणि ठिय्या आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने(नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटी) वाघाला मारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना पाठवावा लागतो. त्यांनी आदेश दिल्यानंतरच वाघाला मारता येते, ही बाब मुख्य वनसरंक्षक विजय शेळके यांनी लक्षात आणून दिली असता आ. वडेट्टीवार यांनी सदर प्राधिकरणाच्या नऊही सदस्यांना बोलावून तसा निर्णय घेण्याचा आग्रह धरला. आंदोलकांची कडक भूमिका लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी सदस्यांची तातडीची बैठक बोलाविली. या समितीचे अध्यक्ष खुद्द मुख्य वनसंरक्षकच आहे. हे विशेष. ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर, भूज, बल्हारपूर, हळदा, बोरगाव, मुडझा, किटाळी, कोसंबी या गावांमध्ये वाघाने धूमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात पाच जणांचा वाघाने बळी घेतला आहे, तिघांना जखमी केले. नऊ जनावरे ठार मारली, तर २२ जनावरांना जखमी केले आहे.शासनाने वाघाला ठार मारण्याचे आदेश दिल्याने आता शेतकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होईल. वाघ हा गावाच्या सभोवताल फिरत असल्याने शेतकरी ऐन हंगामात शेतात जाऊ शकत नव्हते. फार दहशतीची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनात आमच्यासोबत शेतकऱ्यांचाही सहभाग असल्याने शासनाला झुकावे लागले.-विजय वडेट्टीवार, आमदार
पाच तासानंतर ठिय्या आंदोलनाला यश
By admin | Published: June 24, 2017 12:35 AM