मूल : तालुक्याच्या विविध भागांत झालेल्या वाघांच्या हल्ल्यात यावर्षी पाचजणांचा मृत्यू झाला असून, चालू झालेल्या शेतीच्या हंगामात जंगलालगतच्या शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे तालुक्यात वाढलेल्या वाघांचा तातडीने बंदोबस्त करून जनतेला संरक्षण द्यावे, अशी मागणी तालुका काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला मूल तालुका ५० टक्के जंगलाने व्याप्त असून, यातील बहुतांश भाग बफर झोनमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील अनेक गावांत वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी तालुक्यात आगडी येथील कल्पना वाढई, जानाळा येथील वनिता गेडाम आणि कीर्तीराम कुळमेथे, मारोडा येथे मनोहर प्रधाने आणि सुशी येथील वैशाली मांदाडे अशा पाचजणांवर वाघाने हल्ला केल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यात घडलेल्या या पाच घटनांमुळे जंगलालगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून, शेतीच्या मशागतीकरिता शेतकऱ्यांना शेतावर जावे लागत आहे. तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने जंगलालगतच्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. तसेच स्वयंपाकाकरिता सरपण गोळा करण्यासाठी जाणाऱ्या गरीब महिलांमध्येही वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या हंगामात शेतीची मशागत करायची कशी आणि स्वयंपाकाकरिता सरपणाअभावी चूल पेटवायची कशी, असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी व महिला भगिनींना पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील जंगलालगतच्या गावात वाढलेले वाघाचे हल्ले कमी करण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करून शेतकरी आणि महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वात काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. भेटलेल्या शिष्टमंडळात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती संचालक तथा सरपंच अखिल गांगरेड्डीवार, नवनियुक्त शहरअध्यक्ष सुनील शेरकी, नगरसेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, कैलास चलाख, रुमदेव गोहणे आदी उपस्थित होते.