पाचही मजूर जखमी : सावली येथील घटना
सावली : सावली नगराकरिता साडेबारा कोटी रुपये खर्च करून नवीन फिल्टर टाकीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामावर मजुरांची संख्या जादा आहे. दरम्यान, टाकीवर बांधकाम करणारे पाच कामगार अचानक खाली पडले. पाचही कामगार गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवारी घडली.
सावली तालुक्याला शुद्ध पाण्याची सोय व्हावी, याकरिता शासनामार्फत फिल्टर योजना मंजूर झाली. हे काम प्रशांत बोमनवार या कंत्राटदारास देण्यात आले. हे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान, बुधवारी टाकीवरील काम करणारे पाच कामगार अचानक टाकीवरून खाली पडले. त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. अमोल खोबरागडे (३२), पवन विजय गावतुरे (३०), घनशाम नारायण खोबरागडे (४८), विनोद प्रभाकर कोवे (२९), जयपाल अरुण गेडाम (२१) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. ग्रामीण रुग्णालय सावली येथे एक्स-रे तंत्रज्ञ नसल्याने कामगारांना खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागला असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे, हे विशेष.