नागभीड : विहित मुदतीत कराचा भरणा न केल्यामुळे वाढोणा ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांनी तसा आदेशच बजावला आहे. नागभीड तालुक्यात तीन नंबरची ग्रामपंचायत म्हणून वाढोणा ग्रामपंचायतीची ओळख असून राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. साडेतीन- चार वर्षाअगोदर झालेल्या ग्रामपंचायतीच्या तसेच सरपंचपदाच्या निवडणुकीपासूनच ही ग्रामपंचाययत नागभीड तालुक्यात चर्चेचे केंद्रबिंदू बनली आहे. आता ग्रा.पं. सदस्यांनीच विहीत मुदतीत कराचा भरणा न केल्याने या ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र घोषित करण्यात आल्याने या ग्रा.पं. ने तालुक्याचे लक्ष आणखी आपल्याकडे वेधून घेतले आहे. चोकेश्वर दादाजी झोडे, रंजना अभय मुत्तेलवार, शोभा सुरेश सोयाम, मेघा रुपचंद वाघाडे आणि अरविंद रामभाऊ कावळे अशी या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. या सदस्यांनी विहीत मुदतीत कराचा भरणा केला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर येथील राजकीय कार्यकर्ते रुपेश डोर्लीकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने नागभीड पंचायत समितीने या प्रकरणाची चौकशी केली व तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला. या अहवालावर उक्त सदस्यांनी आक्षेप घेऊन वकीलामार्फत युक्तीवाद केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन कण्यात आल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ह) व १६ अन्वये उपरोक्त सदस्यांना अपात्र म्हणून घोषित केले.(तालुका प्रतिनिधी)
वाढोणा ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र म्हणून घोषित
By admin | Published: May 22, 2014 1:00 AM