लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात दोन महिन्यांत वाघाने ५ जणांचा बळी घेतला तर, एकजण गंभीर जखमी झाला. त्यात बफर क्षेत्रात ११ वाघांचा संचार असल्याने नागरिक दहशतीत आहेत. वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मूल तालुक्यातील काही गावे कोर तर, काही बफर झोन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. गावांलगत वन्यप्राण्यांचा वावर आहे. ताडोबा क्षेत्र राखीव असल्याने वन्य प्राण्यांची संख्या वाढतच आहे. यातून शिकारीच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे आगेकूच करीत आहेत. अशावेळी तावडीत सापडलेल्या इसमांचा बळी घेत आहेत. त्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढला. बफर क्षेत्रात ११ वाघांचा वावर असून, इतरही प्राण्यांची संख्या भरपूर आहे. जंगलातील प्राण्यांच्या तुलनेत वनविभागाकडून तयार केलेल्या पाणवठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे हिंस्त्र वन्यप्राणी पाणी व शिकारीच्या शोधात गावाकडे येत आहेत. मानव-वन्यप्राणी संघर्षात दोन महिन्यांत पाच जणांचा बळी गेला. चिंचोली येथील देवाजी राऊत (वय ६४) यांचा गुरुवारी (दि. १९) वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यापूर्वी गणपत मराठे (वय ६०, केळझर), मुनिम गोलावार (वय ४१, चिंचाळा), वासुदेव पेंदोर (वय ६०, रा. मरेगाव), गुलाब वेळमे (वय ५२, रा. जानाळा), देवाजी राऊत (वय ६४, रा. चिंचोली) आदींचा मृत्यू झाला. बोरचांदलीचे विनोद बोलीवर हे जखमी झाले.
"मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांनी जंगलात जाताना काळजी घ्यावी. वाघाने हल्ला केलेल्या परिसरात तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्यावर जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. वनविभागाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यास धोके टाळता येणे शक्य"- राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, मूल