चंद्रपूर : पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन फेऱ्या संपल्या. एकूण ११ हजार ७५५ जागांपैकी आतापर्यंत ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. संस्थास्तर फेरीला प्रारंभ झाला. १ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी पसंतीक्रम भरले जाणार आहेत. ३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश पूर्ण केले जाईल, तर ११ फेब्रुवारी प्रवेशाची कटऑफ राहील. मात्र, दोन प्रवेश फेऱ्यांनंतरही यंदाच्या शैक्षणिक सत्रात एलएलबीच्या ५ हजार जागा रिक्त असल्याची माहिती आहे.
राज्यातील प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार कोणत्याही शाखेचे विद्यार्थी तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला पसंती देतात. यंदा नोंदणीत वाढ झाली. मात्र, प्रत्यक्ष कॅप फेरीत मात्र प्रवेश कमी झाल्याचे दिसून येत आहेत. या अभ्यासक्रमासाठी सीईटीतून पात्र झालेले सुमारे १६ हजार विद्यार्थी होते. त्यापैकी प्रवेशासाठी १३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. राज्यात ५ हजार ४५० जागा अजूनही रिक्त आहेत. आता संस्थास्तरावर प्रवेश पूर्ण केला जाणार असून ११ फेब्रुवारीही प्रवेशाची कटऑफ असणार आहे.
संस्थास्तर फेरीला प्रारंभ
पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन फेऱ्या संपूनही पाच हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता कॉलेज संस्थास्तर फेरीला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमांसाठी १३२ महाविद्यालये आहेत. ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संस्थास्तरावरील प्रवेशाची कटऑफ असणार आहे.
एलएलबी प्रवेशाची स्थिती
विधी महाविद्यालये १३२
सीईटी पात्र १६०७१
प्रत्यक्ष नोंदणी १२८८९
एकूण जागा ११७५५
आतापर्यंतचे प्रवेश ६३०५
रिक्त जागा ५४५०