तहसीलदारांची कारवाई : फौजदारी कारवाईसाठी पोलिसांना आदेश
गोंडपिपरी : गोंडपिपरी तहसीलदारांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास कुलथा नदीघाटावर पोलीस पथकासह स्वतः जाऊन केलेल्या कारवाईत रेती भरलेले पाच ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईत ट्रॅक्टरसह एकूण पाच लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहनमालकांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यासाठी तहसीलदारांनी पोलिसांना आदेश दिले आहे.
याच घाटावरून पळून गेलेल्या उर्वरित ट्रॅक्टरचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती आहे.
तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सदर नदी घाटांमध्ये उच्च प्रतीची वाळू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मागील वर्षीपासून तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव रखडल्याने अनेक रेती तस्कर व माफियांनी चोरटी रेती वाहतुकीचा अवलंब करीत अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशातच गुरुवारी गोंडपिपरी तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी पोलीस संरक्षणात कुलथा रेतीघाटावर धाड घातली. या दरम्यान २० ते २५ ट्रॅक्टरांनी नदीपात्रात उतरून उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येताच तहसीलदार के.डी. मेश्राम व सहकारी यांनी पळ काढू पाहणाऱ्या पाच ट्रॅक्टर अडवून पंचनामा करून पुढील फौजदारी कारवाईकरिता थेट पोलीस स्टेशनला नेऊन जमा केले. ट्रॅक्टरचालक अतुल कोवे, नितेश झाडे, नितीन शेडमाके, पंकज सिडाम, सुरेंद्र मेडपल्लीवार यांच्यासह ट्रॅक्टरमालकांवर कायदेशीररीत्या चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना दिले आहे.
कोट
कुलथा नदीघाटावर अंदाजे २० ते २५ ट्रॅक्टर होते. सोबतच उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. आम्ही उपस्थित झाल्याचे पाहून ट्रॅक्टरचालकांनी पळ काढला. मात्र, या दरम्यान पाच ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. उर्वरित ट्रॅक्टरचा शोध सुरू आहे.
- के.डी. मेश्राम, तहसीलदार गोंडपिपरी