चंद्रपूर : येथील सिस्टर काॅलनीत दिवसेंदिवस समस्या वाढत असतानाच, सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी मागील पाच वर्षांपासून नागरिकांनी सातत्याने संघर्ष सुरू केला आहे. मात्र अद्यापही महापालिका तसेच नगरसेवकांना जाग आलेली नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील सिस्टर काॅलनी, मानवतानगर परिसरामध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे जागा मिळेल तिथे सांडपाणी जमा होत आहे. विशेष म्हणजे, काही नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ते निमुळते झाले आहेत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी नाली बांधकाम करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. येथील महात्मा फुले चौकापासून पाणी साचले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांसह महापालिकेकडे वारंवार तक्रारी, निवेदने दिली आहेत. मात्र नागरिकांची निराशा झाली आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे जागोजागी पाणी साचून असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महापालिका डास निर्मूलनासाठी फवारणी करीत असल्याचा केवळ आव आणत आहे. त्यामुळे प्रथम सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका पदाधिकारी, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही सिस्टर काॅलनी, मानवतानगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.